ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 24 - रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.शोभा शेरबहाददूर थापा असे मयत महिलेचे नाव आहे. शेरबहाददूर जब्बरसिंग थापा (वय 40 रा.उज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन, बाणेर मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. मयत महिलेची भाची पूजा राठोड ( वय 25 रा. खराबवाडी, चाकण मूळ रा. मुपो किल्लारी ता.औसा जि.लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर 302 कलामांतर्गत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या जबाबानुसार, शोभा शेरबहाददूर थापा ही माझ्या आईची लहान बहिण आहे. नातेवाईकांच्या ओळखीने दहा वर्षांपूर्वी तिचे शेरबहाददूर थापा यांच्याशी लग्न झाले. तेव्हापासून मावशी बाणेर मधील उज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन याठिकाणी राहात आहे. मावशीला मूलबाळ नव्हते, तिचे पती बिल्डिंगमध्ये वॉचमनचे काम करतात. दारू, गांजा पिऊन ते मावशीला वेळोवेळी मारहाण करायचे. तिने ही माहिती माहेरच्या लोकांना दिली होती. नातेवाईकांनी वेळोवेळी लातूरवरून येऊन काका शेरबहाददूर थापा यांना समजावून सांगितले होते. काका तासनतास वेगवेगळ्या लोकांशी आणि बायकांशी गप्पा मारत असे. त्यावरून देखील दोघांमध्ये भांडण होत होती. दहा बारा दिवसांपूर्वी मी व माझे पती मावशीला भेटायला गेलो असता आमच्यासमोरच काकाने मावशीला मारले होते त्यांची भांडणे आम्ही सोडविली होती. 23 एप्रिलला दुपारी 3.45 वाजता काका शेरबहाददूर थापा यांनी फोन करून तुझी मावशी मेली असल्याचे सांगितले. चाकणवरून पुण्यात आल्यानंतर काकांना फोन केला असता त्यांनी मावशी रूग्णालयात असल्याचे सांगितले. मावशीचे प्रेत जवळून पाहिल्यानंतर कपाळावर टेंगुळ आणि गळ्याभोवती रस्सीने आवळण्याची खूण दिसली, याबाबत काकांकडे खोदून विचारपूस केली मात्र त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. अखेर त्या दिवशी सकाळी 11.30 वाजता आमची खूप भांडणे झाल्याने त्यांनी रागाच्या भरात घरात असलेल्या दोरीने मावशीचा गळा आवळून तिला ठार मारले असल्याची कबूली त्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप केंजळे करीत आहेत.
रागाच्या भारात पत्नीचा गळा आवळून खून
By admin | Published: April 24, 2017 3:40 PM