पुणे : पतीने पत्नीचे हिडन कॅमेऱ्याद्वारे घरात चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराची साफसफाई करताना पत्नीच्या हाती हा छुपा कॅमेरा लागला आणि पतीच्या कृत्याचे बिंग फुटले.
याप्रकरणी यमुनानगर, निगडी येथील एका ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी ३४ वर्षीय पतीविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ जानेवारी ते २४ एप्रिलदरम्यान चंदननगर परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. फिर्यादी घराची साफसफाई करत असताना त्यांना हॉलमध्ये टीव्हीच्या खाली असलेल्या टेबलवर हिडन कॅमेरा मिळून आला. त्यांनी ही माहिती आपल्या आईला दिली. कॅमेऱ्याची पाहणी केली तेव्हा त्यामध्ये एक मेमरी कार्ड दिसले. फिर्यादींनी ते कार्ड मोबाइलमध्ये टाकून पाहिले असता, त्यांना घरात एकांतवासात असतानाचे चित्रीकरण मिळून आले.
दरम्यान, पती वारंवार व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारावर, माझ्याजवळ तुझ्या अशा काही गुप्त गोष्टी आहेत की, मी जर त्या उघड केल्या तर तुला तोंड दाखवायलादेखील जागा राहणार नाही, असे धमकावत असे. जेव्हा हा कॅमेरा फिर्यादी यांच्या हाती लागला तेव्हा त्यांना पती आपल्याला सतत का धमकावतो, हे समजले. काही दिवसांनंतर आरोपी पती घराची दुसरी चावी तयार करण्यासाठी एका व्यक्तीला घरी घेऊन आला. त्याला फिर्यादींनी विरोध केला. तसेच घराचा दरवाजा उघडला नाही. त्यावेळीदेखील आरोपी पतीने फिर्यादी महिलेला धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.