पुणे : दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा त्याने चक्क मित्रालाच घरात पाठवून आपल्याच घरात चोरी करवली. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही आणि आपल्याच घरात चोरी करणाऱ्या पतीला मित्रासह पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ४१ हजारांचा ऐवज जप्त केला. रोहित अशोक बनसोडे (वय ३२, रा. अण्णा भाऊ साठे नगर, बिबवेवाडी), संदीप शिवाजी जाधव (वय २७, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने आत प्रवेश करून घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे टॉप्स, नथ, मणी असे ९ ग्रॅमचे दागिने व ५ हजार रुपये १७ मे रोजी चोरीला गेले होते. ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात तपास करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना घराच्या परिसरात सीसीटीव्हीत एक जण संशयास्पदरीत्या जाताना दिसला. त्याच्याविषयी चौकशी केल्यावर फिर्यादी महिलेने हा आपल्या पतीचा मित्र संदीप जाधव असल्याचे सांगितले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने रोहित बनसोडे याच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली.
बनसोडेला दारूचे व्यसन आहे. संदीप जाधव त्याचा मित्र आहे. दारू पिण्यास पैसे नसल्याने बनसोडेने मित्र जाधवशी संगनमत केले. बनसोडे याने घराचा दरवाजा उघडा ठेवला. ठरल्याप्रमाणे जाधव याने घरात शिरून डब्यातील दागिने व रोकडे चोरली.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळाेखे, किरण देशमुख, शाम लोहोमकर, अमित पुजारी, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.