पुणे: तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल माध्यमाचा वापर वाढत असताना त्याच्याबरोबरीने सायबर गुन्हयांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या गुन्हयांमध्ये युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय असून, अल्पवयीन विद्यार्थीही गुन्हयांचे बळी ठरत आहेत. सायबर गुन्हयाबाबत विद्यार्थी आणि शिक्षक अनभिज्ञ असल्याने या गुन्हयांना कशाप्रकारे सामोरे जावे याची माहिती नसते. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी, यापासून परावृत्त करण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेच्यावतीने वुईफाईटसीसी हा उपक्रम सुरू केला आहे. हा सायबर क्रा़ईम जनजागृती करिता राबविण्यात येणारा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले,सायबर शाखेकडे २०१६ मध्ये ५५० तक्रारी आल्या होत्या. मात्र, आॅगस्ट २०१७ मध्येच मागच्या वर्षीचा आकडा ओलांडला असून, ५७२ तक्रारी आलेल्या आहेत. यावरून सायबर क्राईम जलद गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. युवा पिढीचा सहभाग वाढत असल्याने सायबर क्राईमबद्दल शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती निर्माण करावी यासाठी हैद्राबाद येथील सिडॅकआणि गुगल इंडिया यांच्या वतीने खास कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.त्यानुसार त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेसाठी पोस्टर, घोषवाक्य, वकृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. दुस-या टप्प्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना सायबर क्राईमच्या विरोधात कसे काम करावे, हे गुन्हे कसे रोखावेत यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिस-या टप्प्यात सिडॅक आणि गुगल इंडिया, आयटी वं कंपन्यांमधील तज्ञ, मानसशास्त्रज्ञ हे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.याव्यतिरिक्त सायबर गुन्हयाबददल इंटरनेटमार्फत तज्ञ व्यक्तींचे ब्लॉग, व्हिडिओ ब्लॉग इत्यादी मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. दि. १६ आॅक्टोबर पासून या उपक्रमाची सुरूवात होत असून, जानेवारी महिन्यापर्यंत यामाध्यमातून कार्यक्रम होत जातील. पुण्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये याची माहिती पोहोचविण्यात आली असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक राधिका फडके यावेळी उपस्थित होत्या.
गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर शाखेचा वुईफाईटसीसी उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 8:06 PM