कामशेत : मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु, वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, धोक्यात येत असलेला निवारा आदी कारणांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना या वन्यप्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी व प्राणीमित्र संघटना उपस्थित करत आहेत. तालुक्यातील नाणे, पवन, आंदर मावळामध्ये मोठी धरणे आहेत. नाणे मावळात शिरोता व वडिवळे, पवन मावळात पवना, आंदर मावळात आंद्रा आदी धरणे, छोटे मोठे तलाव, इतर जलाशय आणि अनेक नद्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात दाट जंगले आहेत. या भागांमध्ये अनेक लहान मोठी गावे, वाड्यावस्त्या असून येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांचाच उदरनिर्वाह हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. यात शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी जोडव्यवसाय आहेत. शेतीत प्रामुख्याने भात, गहू, विविध कडधान्य व खरीप, रब्बी हंगामातील इतर पिके घेतली जातात. मावळातील वाढत्या शहरीकरणाचा फटका अनेक ग्रामीण व दुर्गम भागांमधील गावांनाही बसला आहे. वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. याचप्रमाणे गौण खनिज माती, मुरूम व डबर आदींचे अनेक व्यावसायिक सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असलेले बेसुमार उत्खननामुळे मावळातील अनेक टेकड्या नामशेष झाल्या आहेत. डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जळणासाठी व इतर व्यावसायिक कारणांसाठी जंगल व परिसरातील वृक्षांची कत्तल वाढली असून, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या फोटो व प्रसिद्धीसाठी येतात. लागवड केलेल्या वृक्षांची कोणत्याही प्रकारे काळजी न घेतल्याने तसेच संवर्धनाचे कोणतेही नियोजन नसल्याने लागवड केलेल्या शंभर झाडांपैकी पाच झाडेही जगत नसल्याचा आरोप अनेक पर्यावरणप्रेमी संघटना करीत आहेत. वृक्षतोड ग्रामीण भागातील अनेकांचा व्यवसाय बनला असून, यात वनरक्षकांचाही मोठा वाट असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. या प्राण्यांमुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढले आहेत. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये बिबट्याने नाणे मावळातील भाजगाव येथे दोन शेळ्या, साई येथे वासरू व इतर पाच पाळीव प्राणी व इतर अनेक प्राण्यांचा फडशा पडला. ताजेजवळ एका आश्रमात कुत्र्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला होता.उंबरवाडी येथील पठारावरील धनगरवस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला आहे. याशिवाय अन्य वन्यप्राणी शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. (वार्ताहर)शिकारी वाढल्या : बंदुकीच्या परवान्याचा होतोय गैरवापर दुर्गम भागातील ठराविक गावांमध्ये शासनाने संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने दिले असून, त्याचा विधायक कामांसाठी फारसा उपयोग केला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शिकारी करणे, पाहुणे मंडळींना व व्यावसायिक शिकाऱ्यांना बोलावून रानात शिकार करून पार्ट्या करणे, वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करणे आदीत वाढ झाली आहे. स्थानिकांचा कल याकडे वाढला आहे. याचा फायदा शहरांमधील बंदूकधारी शिकारी घेत असून, याकडे अनेक शासकीय विभागांचा काणाडोळा होत आहे. जंगलांच्या ऱ्हासाला व वन्य प्राणी मानवी वस्तीत येण्याला जबाबदार कोण? वाढत्या शिकारीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. बेसुमार वृक्षतोड व उत्खनन या सर्वांमुळे जैवसाखळीच धोक्यात आली आहे. याचा त्रास या दुर्गम भागातील शेतकरी व नागरिकांनाच होत आहे. सरकार व वनविभागाने या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोषी नागरिक, वनरक्षक व इतरांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे; अन्यथा मावळातील जंगले लयास जातील व वन्य प्राण्यांचा माणसांवरतीही हल्ला सुरू होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
वन्य प्राणी मानवी वस्तीकडे
By admin | Published: January 10, 2017 3:02 AM