गराडे : भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन जखमी हरिण ताब्यात घेतले.पठारमळ्यातील जखमी हरिण पाण्यासाठी व शेतातील टोमॅटो खात असताना कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला होता.दादासाहेब कटके यांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. यामध्ये हरणाच्या पाय व मणक्याला दुखापत होऊन जखम झाली होती.या वेळी दादासाहेब कटके, भाऊसाहेब दळवी, माऊली घारे, भाऊसाहेब गोगावले, नवनाथ कटके, सुहास कटके, नवनाथ लोणकर, ओंकार कटके, जीवन दळवी, दत्तात्रय कटके यांनी जखमी हरणाची काळजी घेतली. वनपाल महादेव सस्ते, वनरक्षक एस. के. साळुंखे, वन कर्मचारी नानासाहेब घाटे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी हरणाला दादासाहेब कटके यांच्याकडून ताब्यात घेऊन कात्रज येथील पशू अनाथालयात उपचारांसाठी सोडले. तेथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून हरणाला जीवदान दिले.भिवरी परिसरात अनेक वन्यजीव राहतात. उन्हाळ्यात त्यांचे पाण्याअभावी भयंकर हाल होतात. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अशा घटना घडतात. हे टाळण्यासाठी वन विभाग व सामाजिक सेवाभावी संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यची सोय करावी, असे आवाहन भिवरी विकास सोसायटीचे उपसभापती भाऊसाहेब दळवी यांनी केले आहे.
तरुणाच्या दक्षतेमुळे जखमी हरणाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:33 AM