पुणे : उन्हाळा सुरू होताच वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात सिंहगड व रविवारी रात्री कात्रज घाटातील डोंगराला मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये वन्यजीव व झाडांचे नुकसान झाले आहे. वनक्षेत्रात आग लागू नये म्हणून जाळ पट्टा तयार करणे आवश्यक असून, कुठेही वणवा लागला तर वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिक, वनविभाग मिळून काम करायला हवे आहे.
दरवर्षी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागतो. त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान तर होतेच, याशिवाय छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात. दिवसेंदिवस वणवा लागल्याच्या घटना वाढत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. वणव्याबाबत वन्यजीव संरक्षक म्हणून कार्यरत असणारे तानाजी भोसले म्हणाले, वणवा लागू नये किंवा तो कोणीही लावू नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. गावागावांमध्ये वणवे लागल्यामुळे होणारे नुकसान, लोकांना सांगितले पाहिजे. गावागावांमध्ये माहितीपत्रक छापून वणवा लावणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यासाठी शिक्षेची तरतूद आहे, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. असे कृत्य करताना कोणी सापडला, तर वनविभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वणवा लावणारा निघून गेलेला असतो. त्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास आरोपी पुराव्यासह सापडू शकतो.
''वनविभागाने जंगलामध्ये या दिवसांमध्ये गस्त घालण्याचे प्रमाण वाढवावे व गस्त घालत असताना जो कोणी विनाकारण जंगलामध्ये फिरत असेल, त्याची झडती घ्यावी. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकूडफाटा आणण्यासाठी महिला जात असतात. बराच वेळा त्यांना अडचणीत जायचे नसते, म्हणून त्या तिथे आग लावतात. अशांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - तानाजी भोसले, मानद वन्यजीव संरक्षक''
''वणवे लागू नयेत म्हणून फायर लाइन काढण्यात आलेल्या आहेत. तसेच वनरक्षकांची गस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठे वणवा लागला तर वन विभागाला कळवावे. -प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी''
इथे करा संपर्क
नागरिकांनी कुठेही वणवा लागला असेल, तर त्वरित वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावरील व्यक्ती तुमच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्याची माहिती देईल. त्यामुळे त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.