-----
लोणी काळभोर : भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलिकडच्या काळात माणसाचे निसर्गाशी संबंध दुरावले असल्याने आणि लोकसंख्या वाढ, जंगलतोड यामुळे वन्यजीव कमी झाले आहेत. अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच वन्य जीवन धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन आयकर विभागाचे आयुक्त छावी अनुपम यांनी केले.
माजी सैनिक व वाघोली वनरक्षक बळीराम वायकर यांनी वने व वन्यजीव यांच्या संरक्षणाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पडल्याबद्दल अनुपम यांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनुपम बोलत होते. वानवडी वनविहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपाल मंगेश सपकाळे यांच्यासह वन व आयकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त अनुपम म्हणाले की, पूर्वी घनदाट अरण्ये असल्यामुळे वन व वन्यजीवांचे आपोआपच रक्षण होत असे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांचे अधिवास संपुष्टात आल्याने वन्य जीवनही धोक्यात आले. एकीकडे शासन विविध प्रजातींना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करी, चोरटी शिकार यामुळे समस्या कमी होत नाही. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील अनेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पक्षी व प्राणी सुरक्षित व प्रदूषणमुक्त स्थळच प्रजननासाठी निवडतात. तसे नसेल तर त्यांच्या प्रजननावर विपरित परिणाम होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. काहीवेळा ते स्थलांतरही करतात, यामुळे जंगलातील अन्नसाखळीही धोक्यात येते. विपरित परिस्थितीत टिकून राहणे अवघड झाल्याने अनेक वन्यजीवांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून, अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रतिकुल परिस्थितीत बळीराम वायकर यांनी केलेली कामगिरी असाधारण आहे. प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करत वने व वन्यजीव यांना वाचवावे, असे आवाहन अनुपम यांनी केले.