पुणे: सध्या वन्यजीव शहरात अनेक भागात आढळून येत आहेत. कारण वन्यजीवांच्या परिसरामध्ये मानवी वस्ती वाढू लागली आहे. परिणामी वन्यजीवांचा वावर वाढला आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमधील मामूर्डी या गावाच्या परिसरात रानमांजराची तीन पिल्ले आढळून आली होती. त्या पिल्लांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सुखरूपपणे पोचविण्यात आले, अशी माहिती स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशनचे रितेश साठे यांनी दिली.
मामुर्डी येथे गोदरेज सोसायटीतील प्लॉटिंगच्या आवारात गवत कापणीचे काम करत असताना कर्मचाऱ्यांना रानमांजरीची २ पिल्ले सापडली. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन, पुणे ह्या संस्थेला दिली. संस्थेतील सदस्यांनी पिल्लं ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तेव्हा ती पिल्ले पूर्णपणे सुदृढ असल्याचे समजले. काही वेळानंतर कर्मचाऱ्यांना अजून एक पिल्लू घटनास्थळी निदर्शनास आले आणि तिन्ही पिल्लांचे आईसोबत पुनर्मिलन करण्याचे ठरविण्यात आले. स्केल्स अँड टेल्स,पुणे आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे ह्या दोन्ही संस्थांनी पिल्लांना आईकडे सोपवण्याचे कामाचे नियोजन केले. त्यानंतर ती पिल्ले सुखरूपपणे तिच्या आईच्या कुशीत पोचली. ज्या भागात ही पिल्ले सापडली होती, त्याच परिसरात तिची आई असणार, त्यामुळे संस्थेच्या सदस्यांनी संबंधित ठिकाणी एका बॉक्समध्ये सुरक्षितपणे पिल्ले ठेवली.