कळस: इंदापूर तालुक्यातील काझड येथे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना मृत हरणासह ताब्यात घेण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक बंदूक, सहा जिवंत काडतुसे एक पुंगळी व सर्च लाईट सह मोटार सायकल आदी मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वनविभागाने दिलेल्या माहीतीनुसार, आरोपी महेश जंगलु माने (वय ४०, रा. इंदापूर) व दत्तात्रेय पोपट पवार (वय ४२, रा. इंदापूर) हे दोघेजण चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून मोटर सायकल वरून घेऊन जात असताना कळस - काझड रस्त्यावरील फिरंगाई मंदिराजवळ आढळून आले. वन कर्मचारी दिसताच त्यांनी पळ काढला. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने या आरोपींना शिकारीचे साहित्य व शिकार केलेल्या मृत हरणासमवेत ताब्यात घेतले आहे.तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अशोक नरोटे, वनरक्षक पूजा काटे, वनमजूर ज्ञानदेव ससाणे यांनी ही कारवाई केली.
तालुकायात शिकारीचे प्रमाण वाढले
तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार ही नेहमीच होत आहे. कुंभारगाव येथे १ मे च्या रात्री खोकड प्राण्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली कुंभारगाव येथील दोन आरोपी ताब्यात घेतले होते. यानंतर आज पुन्हा शिकार उघडकिस आली आहे. तालुक्यात हजारो हेक्टर मोठे वनक्षेत्र आहे. यामध्ये चिंकारा सह अनेक प्राणी आहेत. मात्र त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.