नारायणगाव : शेतकरी व सहकार संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे़ मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस उलटूनही विस्कळीतपणा सुधारलेला नाही़ नोटाबंदीची परिस्थिती सुधारली नाही, तर शेतकरी शेतमालविक्रीवर बंदी आणेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी नारायणगाव येथे व्यक्त केला़केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी व सर्व सामान्य जनता यांच्या हिताला बाधा येईल, असे अनेक निर्णय घेतल्याने सरकारला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव येथे निषेध मोर्चा काढून नारायणगाव बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले़ या वेळी मार्गदर्शन करताना अतुल बेनके बोलत होते़ या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अॅड़ संजय काळे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, सूरज वाजगे, शिरीष बोऱ्हाडे, बाळासाहेब खिलारी, दीपक औटी, राजश्री बोरकर, दादाभाऊ बगाड, अनिलतात्या मेहेर, विनायक तांबे, दिनेश दुबे, सीताराम खिलारी, सुजित खैरे, दिलीप कोल्हे, पूजा बुट्टे-पाटील, ज्ञानदेव बोऱ्हाडे, प्रदीप थोरवे, विक्रम भोर, पूजा अडसरे, अंजली खैरे, सुजाता डोंगरे, सिम्मी शेख, सुप्रिया खैरे, ज्योती संते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ अॅड़ काळे म्हणाले, ‘‘नोटाबंदीला विरोध नाही; परंतु जे उद्दिष्ट होते ते सफल झाले नाही़ घाईगर्दीत नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले आहे़ तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले, ‘‘शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे़ नोटाबंदी करताना योग्य ती उपाययोजना राबविणे आवश्यक होते.’’ (वार्ताहर)
आंदोलन तीव्र करणार : बेनके
By admin | Published: January 10, 2017 2:24 AM