लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रुग्णांची चुकीची आकडेवारी जाहीर केली. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. हा महापालिकेची, पर्यायाने शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार आहे, असा आरोप महापौरांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ८) विधान भवनात होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीपूर्वी मोहोळ पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हा गंभीर आरोप केला. आमदार सिद्धार्थ शिरोळे या वेळी उपस्थित होते.
“कोरोना निर्मूलन कामात पुणे शहराने देशात गौरव व्हावा असे आदर्श काम केले. सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट न्यायालयात पुणे शहरात एक लाख रुग्ण असल्याचे सांगितले. ही आकडेवारी जिल्ह्याची आहे, फक्त पुणे शहराची नाही हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळेच न्यायालयाने कडक लॉकडाऊन करण्याविषयी सांगितले,” असे मोहोळ म्हणाले.
न्यायालयात तर याची दाद मागूच, पण सरकारनेही त्वरित खुलासा करावा, अशी आमची मागणी आहे. ती मान्य करावी, अन्यथा चुकीच्या आकडेवारीवरून लादल्या जाणाऱ्या कोणत्याही कडक निर्बंधांना आम्ही विरोध करू, असाही इशारा मोहोळ यांनी दिला.