५ ते ८ टक्के कमी होण्याचा अंदाज : साधारण तांदळापेक्षा बासमती तांदळाचा उत्पादन खर्च जास्त
पुणे : बियाणांची विक्री १० टक्क्यांनी कमी तसेच यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने भात लागवड कमी झाली आहे. त्याचबरोबर साधारण तांदळाच्या उत्पादन खर्चापेक्षा बासमती तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी खूप जास्त खर्च येत आहे. त्यामुळे ‘किंग ऑफ राईस’ ओळख असलेल्या बासमती तांदळाचे उत्पादन यंदा कमी होईल. अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तांदळाची न्यूनतम आधारभूत किंमत (एमएसपी) १८८६ ते १८८८ रुपये असे निश्चित केले आहेत. परंतु, वर्षभरात शेतकऱ्यांना बासमतीच्या भाताचे भाव २००० ते २४०० रुपयांपर्यंतच मिळाले आहेत. साधारण तांदळाच्या बियाणांपेक्षा बासमती बियाणे खूप महाग असतात. शिवाय साधारण तांदळापेक्षा बासमतीचे उत्पादन येण्यासाठी वेळही खूप जास्त लागतो. बासमतीचे भाव साधारण तांदळापेक्षा दीडपट किंवा दुप्पट मिळाले नाही तर शेतकरी बासमतीचे उत्पादन कमी करतो. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा बासमती कमी लावला आहे. बियाण्यांची विक्री पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे बासमतीचे उत्पादन पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते ८ टक्के कमी येण्याची शक्यता आहे.
-----
...या राज्यात होते बासमती तांदळाचे उत्पादन
देशातील सात राज्यांतील ९५ जिल्ह्यांत बासमती तांदळाचे उत्पादन प्रामुख्याने होते. त्यात पंजाब, हरियाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादित होतो. बासमती तांदळाच्या उत्पादनासाठी विशेष पाणी, हवामान, माती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बासमतीचे धान (बीज) लागते.
-----
कोट
देशात बासमतीचे उत्पादन १९ ते २० लाख हेक्टर जमिनीवर घेतले जाते. परंतु, यंदा मात्र पेरणीचे प्रमाण ५ ते ८ % कमी होण्याची शक्यता आहे. त्यातही १५०९ बासमतीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे. बासमतीचे उत्पादन प्रति हेक्टरी ५० ते ६० क्विंटल होत असते. एक हेक्टरला जास्तीत जास्त ६५ क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकते. परंतु, गेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. बासमती तांदळाचे उत्पादन यंदा ५ ते ८ टक्के कमी येण्याची शकता आहे.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)