पुणे : भारतीय वाद्यसंगीतावर अमेरिकन समकालीन नृत्याचा आविष्कार रसिकांना रविवारी अनुभवायला मिळणार आहे. ‘द दुर्गा प्रोजेक्ट’ या आगळ्यावेगळ्या नृत्यमैफलीचे १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या शक्ती आणि ऊर्जेच्या रूपातील दुर्गा देवीची अनेकविध रुपे आणि देवीप्रती असलेल्या भक्तीचा आविष्कार पाहायला मिळणार आहे.जोनाथन हॉलंडर हे कार्यक्रमाचे कला दिग्दर्शक आहेत. स्वत: नर्तक व नृत्य दिग्दर्शक असलेल्या हॉलंडर यांना तरुण वयातच भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये रुची निर्माण झाली. पाच परदेशी नृत्याकलाकारांसह भरतनाट्यम नृत्यातील प्रसिद्ध कलाकार उन्नथ एच. आर. आपल्या पदन्यासातून दुर्गेची ही कथा फुलवणार आहेत. ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. राजन व पं. साजन मिश्रा यांचे संगीत या कार्यक्रमास लाभले आहे. कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संस्थेच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सचिव अरुंधती पटवर्धन यांनी दिली.ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर म्हणाल्या, ‘पंचवीस वर्षांपूर्वी जोनाथन हॉलंडर यांनी निर्मिलेल्या 'साँग्ज आॅफ टागोर' या कार्यक्रमात मला नृत्यातून टागोरांच्या काव्याचे माझे आकलन मांडण्याची संधी मिळाली होती. तो अनुभव अतिशय सुंदर होता. जोनाथन यांना भारतीय विचार व तत्त्वज्ञानाविषयी प्रेम आहे. त्यांनी बसवलेल्या ‘दुर्गा’ या नवीन नृत्याविष्कारात भारतीय वाद्यसंगीत आणि अमेरिकन समकालीन नृत्य यांचा सुरेख मिलाफ असून पुण्यातील चोखंदळ नृत्यरसिकांसाठी हे नृत्य पाहायला मिळणे ही एक पर्वणीच ठरेल.’
भारतीय, अमेरिकन मिलाफातून उलगडणार दुर्गेचे अंतरंग; १४ जानेवारीला पुण्यात ‘द दुर्गा प्रोजेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 5:39 PM
‘द दुर्गा प्रोजेक्ट’ या आगळ्यावेगळ्या नृत्यमैफलीचे १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे पाच परदेशी नृत्याकलाकारांसह उन्नथ एच. आर. फुलवणार दुर्गेची कथाकलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संस्थेच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम