पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक येत्या 30 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आली असून त्यात विविध शैक्षणिक निर्णय घेतले जाणार आहेत. परंतु,बी.एड.,एम.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये दररोज हजर न राहता अनेक विद्यार्थी बी. एड., एम.एड. अभ्यासक्रमाची पदवी मिळवत असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या पदाधिका-यांनी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय घेतला.परंतु,त्यावरील अंतिम निर्णय विद्या परिषदेत घेतला जाणार आहे. मात्र, काही महाविद्यालयांकडून त्यास विरोध केला जात आहे. परिणामी महाविद्यालयांचा विरोध डावलून विद्यार्थी व समाज हिताचा विचार करून विद्यापीठ बायोमेट्रिक हजेरी घेणार का? हे पहाणे उत्सूकतेचे ठरणार आहे. शुल्क वाढीबाबत सुध्दा बैठकीत चर्चा होईल.(प्रतिनिधी)