पुणे : त्रिपुराप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने लोकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे पुढचा क्रमांक पश्चिम बंगालचा असून तेथेही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवून परिवर्तन आणू असा विश्वास भाजपाच्या त्रिपुरातील विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी व्यक्त केला. वकृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यामालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात बदलता पूर्वांचल या विषयावर ते बोलत होते. देवधर म्हणाले, त्रिपुरामधून कम्युनिस्टांचे समूळ उच्चाटन केल्यानंतर भविष्यात आता इथली जनता त्यांना संधी देणार नाही. त्यामुळे त्रिपुरानंतर आता पश्चिम बंगालचा क्रमांक असून तेथेही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवू. गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरातील माणिक सरकार यांच्या शासनाला येथील जनता कंटाळली होती. त्यांनी राज्याला विकासापासून वंचित ठेऊन तेथील जनतेवर अन्याय केला होता. स्वत:चा विकास आणि राज्य भकास अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणून पिचलेल्या जनतेने विकासाचा मार्ग स्वीकारला. इशान्यकडेली जनतेबाबत बोलताना देवधर म्हणाले, इशान्यकडेली नागरिकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा वाटा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर नागालँडमध्ये सात दिवस बंद पाळण्यात आला होता. इशान्य भारतातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत आम्हाला कधी सांगण्यातच आले नाही. आम्हाला महात्मा गांधी नंतर फक्त इंदिरा गांधी शिकवल्या. जे खरे योद्धे होते त्यांना दहशतवादी ठरविण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली होती. काँग्रेसला फक्त येथील सत्ता हवी होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इशान्य भारताचे उपेक्षा पर्व सुरु झाले होते. ईशान्य भारताला विकासापासून वंचित ठेऊन काही राज्य स्वत:हून चीनच्या घशात घालण्याचा काहींचा डाव होता. ख्रिश्चन मिशनºयांकडून केले जाणारे धर्मांतर आणि दहशतवाद्यांचा धुमाकूळ ही तेथील मुख्य समस्या होती. ही समस्या आता काही प्रमाणात दूर झाली आहे. तेथील जनतेच्या मनात ते भारताचा घटक नसल्याचे बिंबवले जात होते, मात्र तेथील जनतेला ते भारतीय असल्याचा अभिमान आहे. इशान्य भारतात २८ दिवस राहणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे. इशान्य भारतातील लोक हे आता परतीच्या मार्गावर असून ते स्वत:ला अभिमानाने भारतीय म्हणत आहेत.
पश्चिम बंगलामध्येही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवू : सुनील देवधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:48 PM