पुणे :दिवसेंदिवस विस्तारत असलेल्या पुणे शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई सेवकांचा सन्मान व्हावा यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. आपल्या परिसरात काम करणाऱ्या सेवकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करावा असे करण्यात येत असून या चॅलेंजचा स्वीकार पुणेकर करणार का याचे उत्तर येत्या काळात मिळेल.
४० लाख लोकसंख्येच्या पुणे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी १०५०० सफाईसेवक व सेविका आणि ४५०० कचरावेचक स्वच्छ संस्थेचे सेवक मिळून करतात. या सर्वांना त्यामागे अल्प मोबदला मिळतो. पण त्यासोबत समाजाचा अविभाज्य घटक असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबतचा फोटो #RealHero #MajhaSafaiSevak या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले आहे. स्वतः मोळक यांनी त्यांच्या परिसरातील सेविका मीना चव्हाण यांच्या सन्मानार्थ फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी आपला अनुभवही शेअर केला आहे.
मोळक यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
नमस्कार पुणेकर,
“रियल हिरो : माझा सफाई सेवक“
आपल्या परिसरातील रस्ते - गल्ली सफाई करणारे हेच खरे आपले हिरो आहेत.
माझ्या कस्तुरबा सोसायटीमधील घरोघरी जावून ओला व सुका कचरा घेणाऱ्या आहेत ‘सौ मीनाताई चव्हाण' यांच्या सन्मानार्थ फोटो काढत आहे. या निमित्ताने मी आवाहन करतो की पुणे शहरांमध्ये असे जवळजवळ ४५०० लोक काम करतात.प्रत्येक घर व इमारतीमध्ये रू ६० कमीत कमी मिळावेत हीच अपेक्षा असते पण ती ही नागरिक देत नाहीत याचे वाईट वाटते. खर तर आपण सहजच कोठे गेलो वा हाॅटलेला गेलो तर किती पैसे जातात.आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा नेण्यासाठी रु२ प्रतिदिन (प्रतिमाणशी ५० पैसे) हे देणे अवघड आहे का?ते शुल्क आपण द्यावे ही विनंती.
मी आपणांस या निमित्ताने आवाहन करतो की आपल्या परिसरातील सफाई सेवकाबरोबर एक सेल्फी काढा व सोशल मिडीयावर टाका. त्यासोबत लिहा “रियल हिरो : माझा सफाई सेवक“ कारण यामुळे त्यांच्या सेवेचा सन्मान तर होईलच व आली कृतज्ञता व्यक्त होईल. रस्तावर कचरा टाकू नका व इतर ही घाण करू नका ही नम्र विनंती. चला तर मग स्वत:पासून स्वच्छतेची सुरूवात करूया...!
- ज्ञानेश्वर मोळक
सह आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे मनपा
आता या पोस्टला पुणेकर कसा प्रतिसाद देतात हेच बघणे औत्सुक्याचे असणार आहे.