Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:17 PM2024-08-27T17:17:53+5:302024-08-27T17:18:58+5:30
संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले
तळेघर (आंबेगाव तालुका) : आगामी काळात महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे भाकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गाव वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन या भागाचा दौरा केला. यावेळी तेरुंगण (ढगेवाडी) येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुरुवातीला आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट काढले, जेव्हा जेव्हा आदिवासी बांधव अडचणीत, संकटात असतील तेव्हा शरद पवार त्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत. याची उतराई म्हणून आदिवासी बांधव हे आजपर्यंत शरद पवारांना विसरले नाहीत त्याचे उदाहरण म्हणजे आताची लोकसभा निवडणूक आहे. आता दोन-तीन महिने राहिले आहेत. महाराष्ट्राचे हे सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे त्यांनी या वेळी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान आदिवासींनी रस्ता, वीज, हिरडा, बेरोजगारी, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, रेशनिंग कार्डवरती मिळणारे धान्य, नवीन रेशनिंग कार्ड फाॅरेस्टमधील अडीअडचणी याबाबतच्या अडीअडचणी कोल्हे यांच्या समोर मांडल्या. या अडीअडचणी समजून घेत लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे कोल्हे यांनी आदिवासी बांधवांना सांगितले. या वेळी डाॅ. कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण, राजपूर, तळेघर, फलोदे, जांभोरी, चिखली, पोखरी, डिंभे, शिनोली या गावांना भेटी देऊन येथील आदिवासी बांधवांचे प्रश्न व अनेक अडचणी समजावून घेतल्या. आदिवासी गावागावांमध्ये कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.