पुणे : संशोधन क्षेत्रात रमणारा आणि साहित्यक्षेत्राच्या बाहेरचा असूनही माझी संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड हाच माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. युवकांच्या मनात विज्ञानाविषयीची ओढ निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी भावना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
आयुका येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा प्रथेप्रमाणे पहिला सत्कार डॉ. कसबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंगला नारळीकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
डॉ. नारळीकर म्हणाले, युवकांच्या मनात विज्ञानाविषयीची ओढ निर्माण व्हावी, यासाठी मी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.कसबे म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची झालेली निवड ही मराठी साहित्य विश्वाला अतिशय आनंद देणारी घटना आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होतील आणि विज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी राहिलेली लोकशाही अधिक समृद्ध होईल.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, यंदाचे संमेलन बहारदार होईल. डॉ. नारळीकरांनी त्यांच्या लेखनातून जिज्ञासूवृत्ती आणि विज्ञाननिष्ठा मराठी समाजमनात रुजविली. आकाशातील एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव दिले आहे. अशा कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत होत असलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद आकाशाशी नाते जडलेले डॉ. नारळीकर भूषवित आहेत याचा आनंद आहे.