पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर तेथील वाहतूकीला अनुसरुन गतिरोधकाबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे़ महापालिकेने स्थापन केलेल्या गतिरोधक आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ या बैठकीला शहर अभियंता प्रशांत वाघमारे, वाहतूक नियोजक श्रीनिवास बोनाला, राजेंद्र राऊत, पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इनामदार, कनिज सुखरानी, प्रांजली देशपांडे, विकास ठकार आदि उपस्थित होते़ बाणेर रोडवर झालेल्या अपघातानंतर शहरातील रस्त्यांवरील विविध प्रकारच्या अशास्त्रीय गतिरोधकाविरोधात आवाज उठविल्यानंतर महापालिकेने गतिरोधक आढावा समितीची स्थापना करण्यात आली़ या समितीची बुधवारी पहिली बैठक झाली़ इनामदार यांनी सांगितले की, पादचारी मार्गाबाबत महापालिकेने जसे धोरण निश्चित केले, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर तेथील गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे नेमके गतिरोधक कसे असावेत, याचे निकष निश्चित करावे व त्याप्रमाणे धोरण ठरवावे़ नागरिकांची, नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून महापालिकेला पत्र दिले जाते व त्या ठिकाणी गतिरोधक बनविले जातात़ त्यामुळे निकष पाळले जात नाहीत. पुढील बैठक दोन आठवड्यात घेण्यात येणार असून त्यानंतर गतिरोधकांबाबतचा अहवाल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले़
गतिरोधकबाबत धोरण ठरविणार
By admin | Published: April 20, 2017 7:03 AM