चाकण (पुणे) :खेड तालुक्यातील सर्वपक्षीय एकत्रित होऊन आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात २०२४च्या विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार देऊन त्यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सर्वपक्षीय पॅनलचे प्रमुख भाजपचे अतुल देशमुख, ठाकरे गटाचे अमोल पवार, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, संजय घनवट, शिंदे गटाचे राजूशेठ जवळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चाकण येथे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वपक्षीय पॅनलचे नवनिर्वाचित संचालक विजयसिंह शिंदे, माणिक गोरे, महेंद्र गोरे, सागर मुन्हे, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, क्रांती सोमवंशी, संदीप भोमाळे आदींचा सन्मान करण्यात आला.
शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पांडुरंग गोरे, गणेश नाणेकर, महादेव लिंभोरे, रामहरी आवटे, लक्ष्मण जाधव, गोरख गवारे, संदीप सोमवंशी, किरण गवारे, पांडुरंग बनकर, रत्नमाला भुजबळ, चंदन मुन्हे, अनिकेत केदारी, स्वामी कानपिळे आदी उपस्थित होते.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. या प्रश्नावर अतुल देशमुख यांनी सांगितले की, बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे चित्र समोर आले, ते परिवर्तनाच्या बाजूने आहे. आमदार मोहिते यांनी धनदांडग्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारांनी उमेदवारांकडे पैशाची अपेक्षा ठेवली.
शिवसेनेचे नेते अशोक खांडेभराड यांनी सांगितले की,आमदार दिलीप मोहिते पराभूत होतील, असे मी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी काळजी घेतली आणि पैसे वाटले आणि एटीकेटीने पास झाले. सर्वपक्षीय पॅनल उभे करताना सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवले. आमदारांना त्यांच्या गावात बूथवर स्वतः थांबावे लागले नाही. बाजार समितीत मागील काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे.