पुणे : ‘राम मंदिर उद्घाटनाचे मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेले नाही, निमंत्रण आले तर जाण्याचा जरूर विचार करणार आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भिडेवाडा व महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्याा जागेला पवार यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. संसद खासदार निलंबनावर अजित पवार म्हणाले, अनेक खासदार काम करत असताना नियम भंग झाला की कारवाई केली जाते. मला माहिती नाही तिथे काय घडले, विधानसभेत काय घडले असते, तर मी सांगू शकलाे असताे. उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री त्यांनी जनाधार मिळवलेला असतो, जिथं काय घटना घडली, ती कारवाई केली आहे.
मनोज जरांगेच्या इशारा सभेवर बोलताना पवार म्हणाले, कोणी काही मागणी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारला नियमात आणि कायद्याच्या चौकटीत बसेल त्याच गोष्टी कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण टिकले नाही, फडणवीस यांनी अभ्यास करून दिलेले आरक्षण टिकले पण पुढे ते उच्च न्यायालयात टिकले नाही. आता तिसऱ्यांदा आरक्षण देताना टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.
अमित शाह यांचे राज्यसभा आणि लोकसभेत काम सुरू आहे. त्यामुळे ते आता भेटणार नाहीत. ते झाले की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोलावतो असे म्हटले आहे. पण त्यांनी अचानक निरोप दिला तर आम्ही आमचे दौरे रद्द करून अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.