पुणे : महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात येणाऱ्या ३४ गावांमधील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दिले. गावांचा समावेश व्हावा, यासाठी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी न्यायालयात झाली. सर्व गावांचा समावेश करण्यासाठी अनुकूल असल्याचे पत्र सरकारने न्यायालयाला दिले. याचिकाकर्त्यांनी अनुकूल म्हणजे नक्की काय करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे मत व्यक्त केले. मोजक्याच गावांचा समावेश करणार की सर्व गावांचा, अंशत: करणार की संपूर्ण करणार, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. सरकारने ते स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ते मान्य करीत सरकारने १२ जूनपर्यंत याबाबत न्यायालयाला स्पष्ट काय ते कळवावे, असे सांगितले. या गावांपैकी १९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. निवडणूक झाली तर पैसे व मनुष्यबळही वाया जाईल, असे निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करावी व निवडणूक रद्द करण्याबाबत काय करता येईल, त्याची माहिती घ्यावी, असे सांगितले.
हद्दवाढीतील गावांची निवडणूक होणार रद्द?
By admin | Published: May 05, 2017 3:12 AM