लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सध्या शहरामध्ये एल अँड टी, महावितरण आणि महापालिकेच्या विविध कामांसाठी रस्ते खोदाई सुरूच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून या कंपन्यांना ३१ मे अखेरपर्यंत खोदकाम करण्यास परवानगी दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरात खोदलेले रस्ते पूर्ववत होणार का, असा मोठा प्रश्न पुणेकरांसमोर आहे. महापालिकेच्या रस्ते खोदाई धोरणानुसार एप्रिलअखेरपर्यंतच कोणत्याही कामांसाठी रस्ते खोदाई करण्याची परवानगी देण्यात येते. त्यानंतर विविध कामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला वेळ मिळावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. या रस्तेखोदाईमधून खासगी कंपन्यांकडून महापालिकेला महसूल देण्यात येतो. त्यामुळे खोदाईनंतर सर्व रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु महापालिका प्रशासनाने एल अँड टी या खासगी कंपनीच्या वतीने विविध वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच सध्या महावितरणच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात विद्युतवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या वतीने काही ठिकाणी नवीन फुटपाथ, सिमेंट रस्ते व काही ठिकाणी पाण्याच्या पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. या सर्व गोष्टी अत्यावश्यक सेवा असल्याने या कंपन्यांना थेट ३१ मेपर्यंत खोदाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सध्या शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले असल्याचे चित्र आहे. यामध्ये काही ठिकाणी काम पूर्ण होऊनही येथील रस्ते पूर्ववत केले नाहीत. यामुळे ऐन पावसाळ्यात हे खोदलेले रस्ते असेच राहिल्यास मोठ्या प्रमाणात चिखल, पाणी साठल्याने मोठे अपघात होण्याची देखील शक्यता आहे.
खोदलेले रस्ते पूर्ववत होणार का?
By admin | Published: May 29, 2017 3:25 AM