लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणेकरांच्या लाडक्या सिंहगडावर भगवा फडकवण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मात्र यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी उंचावर फडकवलेल्या ध्वजांचा अनुभव पाहता सिंहगडावरच्या बेलाग वाऱ्यात आणि तुफानी पावसात महापालिकेचा भगवा ध्वज टिकणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. केवळ अस्मितेसाठी पुणेकरांचे लाखो रुपये पणाला लावण्यापेक्षा सिंहगडावरील आवश्यक डागडुजीसाठी खर्च करा, अशी भूमिका घेतली जात आहे.
मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सिंहगडावर ध्वज फडकवत ठेवणे अवघड असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. हा पैशांचा अपव्यय असल्याचा दावा त्यांनी केला. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासनेंनी मात्र हा अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगत इतर आवश्यक कामांसाठीही निधी दिल्याचे सांगितले.
पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा भव्य तिरंगा फडकला तो कात्रजच्या तळ्यामध्ये. नगरसेवक वसंत मोरे यांनी परिसरातून कुठूनही दिसेल, असा तिरंगा तयार करून घेतला. यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण त्यानंतर मात्र या झेंड्यांची निगा राखणे त्यांच्यासाठी मनस्तापाचे ठरले. वाऱ्याने वारंवार फाटणाऱ्या ध्वजामुळे एक कामगार झेंडा शिवण्यासाठीच पूर्ण वेळ ठेवायची पाळी त्यांच्यावर आली. आता तर फक्त राष्ट्रीय सणांनाच हा ध्वज फडकावला जातो.
या अनुभवाबद्दल वसंत मोरे म्हणाले, “झेंडा फाटत असल्याने वेगवेगळी कापडे आणावी लागली. शेवटी आम्ही पॅराशुटचे कापड वापरले. ध्वजाचा अवमान होवू नये म्हणून तिथे नियुक्त पालिका कर्मचाऱ्याला मी स्वखर्चाने शिलाई मशिन घेऊन दिले. पण त्या कर्मचारी महिलेची बदली झाल्यानंतर आता हा ध्वज फडकवलाच जात नाही.”
या झेंड्यांच्या हौसेपायी वारेमाप खर्च होत असताना पुण्यात जागोजागी असे झेंडे उभारण्याचा धडाकाच नगरसेवकांनी लावला. कोट्यवधी रुपये खर्चून शनिवारवाडा, वारजे आदी ठिकाणी उंचावर झेंडे फडकावले गेले आहेत. अर्थात हे झेंडे वरचेवर काढून ठेवावे लागत असल्याची कबुली खुद्द रासने यांनीच दिली. रासने म्हणाले, “शनिवारवाड्यावरील झेंड्यावर मी सतत लक्ष ठेवतो. पाऊस आणि वारा असण्याच्या काळात हा झेंडा काढून ठेवला जातो. वर्षातले जवळपास सहा महिने झेंडा फडकत असतो.”
चौकट
सिंहगडावर ३० मीटर उंचीचा स्तंभ उभारून भगवा ध्वज फडकवणार जाणार आहे. कात्रजमधील उंचावरील तिरंग्याचा अनुभव असणाऱ्या वसंत मोरे यांनी सिंहगडावरील ध्वज टिकण्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यापेक्षा गडावरील सुविधांवर खर्च करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचा दावा खोडून काढताना हेमंत रासने म्हणाले, “सिंहगडावरील भगवा हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. इतर ज्या सुविधांसाठीही आम्ही तरतूद केलीच आहे. आणखी कोणी काही लक्षात आणून दिले तर त्यासाठीही निधी देऊ.”
चौकट
शिवप्रेमींना आनंद
“सिंहगडावरील दूरदर्शनचा टॉवर ही गडाची अनेक दिवसांपासूनची ओळख. पण आता ही ओळख भगव्या ध्वजात बदलणार असेल तर शिवप्रेमींसाठी ती आनंदाची बाब आहे. भगव्या ध्वजाला कोणाचा विरोध असणार नाही. प्राधान्य म्हणून गडाच्या परिसरात अन्य सुविधा व्हाव्यात, अशी मागणी असू शकते.”
- नंदू मते, सिंहगड अभ्यासक