पुणे : परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला एका उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगून आपल्याच हद्दीतले उपाहारगृह आहे ना? मग उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्यायचे, अशी विचारणा केली. या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. या कर्मचाऱ्याने, ‘‘मॅडम, साजूक तुपातील बिर्याणी आणू का?’’ असे विचारले. ‘‘फार स्पायसी नको. जरा तोंडाला टेस्टपण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉन्सपण आण.’’ असे सांगितले. यावर बिर्याणीचे पैसे कसे देणार, असे नारनवरे यांनी विचारल्यावर, उपाहारगृहात पैसे देतो, असे त्याने सांगितले. तेव्हा ‘हद्दीतील उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्यायचे.’, अशी विचारणा नारनवरे यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ध्वनीफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ध्वनिफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे. ध्वनीफित खोडसाळपणे प्रसारित केली असून, त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आली (मॉर्फ) आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने ध्वनिफित प्रसारित केली असल्याचा दावा उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे.