पुणे : इंदापूरमधूनकाँग्रेसतर्फे अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलेले आणि सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेले हर्षवर्धन पाटील व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. या वादाचे कारण इंदापूरचे काँग्रेस कार्यालय ठरले असून हे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही जिल्हा काँग्रेस समितीने दाखवली आहे.
काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्ष मंत्रिपद राखण्यात यशस्वी झालेले पाटील हे २०१४साली पराभूत झाले. त्यानंतर २०१९मध्ये भाजप प्रवेश करूनही त्यांना राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना सर्व कारभार ते इंदापूरच्या काँग्रेस कार्यालयातून चालत असे. मात्र पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते.
त्यानंतर काही दिवसांनी भाजपचा झेंडा लावून काँग्रेस कार्यालय ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या जागेचे बांधकाम १९८१ साली काँग्रेसने केले आहे. तेव्हापासून हे कार्यालय काँग्रेसच्या मालकीचे असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.त्यामुळे या कार्यालयाचा ताबा सोडण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.अन्यथा ही जागा जिल्हा काँग्रेस याबाबत विरोधात कोर्टात जाईल असे जिल्हा काँग्रेस समितीने स्पष्ट केले.