लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लादलेल्या अंशत: टाळेबंदीवर दुकानदार, हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातून सरकार काय साधणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन आर्थिक गाडे सुरळीत कसे होणार? याची वाट पाहात बसलो होतो. होईल. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ यातल्या संचारबंदीने फारसा फरक पडणार नाही. तसेही गर्दीचे प्रमाण कमी झाले होते. हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच होती. तरी आता फक्त हॉटेल, खाणावळी, बार, रेस्टॉरंटच बंद केली, बाकीचे चालू ठेवले. एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा हे योग्य नाही. बंदच करायचे होते तर सरसकट बंद करायेच होते. अंशत: टाळेबंदीने काय होणार? आमचे होणारे नुकसान कसे भरुन निघणार? असे प्रश्न लहान व्यावसायिक आणि हॉटेलचालकांनी उपस्थित केले आहेत.
कोट
“नियमावलीमुळे नक्कीच आमच्या व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ६ नंतरच सुरु होत असतात. वेळेच्या बंधनामुळे फटका बसणार आहे. मागील वर्षीही हंगाम वायाच गेल्यासारखा होता. यावर्षी अपेक्षा होती. पण आता त्यावरही पाणी पडल्यासारखे वाटत आहे.”
- उद्धव शेळके, मंडप व्यावसायिक.
कोट
“चहाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. इतर ठिकाणी होणारी गर्दी प्रशासनाला दिसत नाही का? हॉटेल व्यवसायावरती मर्यादा घातल्या जातात. सर्वांना समान न्याय लावला पाहिजे. सात दिवस दुकान बंद ठेवून मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. किमान सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत तरी सुरू ठेवण्याची परवानगी हवी होती.”
- निखिल शेजवळ, चहा व्यावसायिक
कोट
“आर्थिक गणित कोलमडणार आहे. यापूर्वी संध्याकाळी आठ वाजता व्यवसाय बंद करावा लागत होता. खऱ्या अर्थाने संध्याकाळी सहानंतरच ग्राहकांची गर्दी वाढायची. दिवसभरात फार धंदा होत नव्हता. आता सगळेच बंद. नुकसान सोसावे लागणार.”
- दीपक होले, वडापाव विक्रेते.
कोट
“कोरोनामुळे आमच्या व्यवसायाला मोठे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षभरापासून या धंद्यात मंदी आली. आयटी सेक्टर पूर्णपणे बंद असल्याने व्यवसाय कोलमडला. आता सावरण्याची आशा असताना पुन्हा रुग्णांची संख्या वाढली. जागा खरेदीसाठी गुंतवलेले पैसे देखील नागरिकांनी काढून घेत आहेत.”
-निखिल पवार, रिअल इस्टेट एजंट.
कोट
“सकाळी प्रत्येकाची कामाला जाण्याची गडबड असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत ग्राहकांची संख्याही कमी असते. संध्याकाळी सहानंतर ग्राहकांची गर्दी वाढते. परंतु वेळेवर बंधन घातल्याने धंदा होणार नाही. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येणे अवघड होत चालले आहे.”
- सुनील भोज, मोबाईल विक्रेते.
कोट
“कोरोनाचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायाला बसला. कामगारांचा पगार देखील निघत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. आता पुन्हा सात दिवस बंद ठेवून मोठे नुकसान होणार आहे. पार्सल सेवा जरी सुरू ठेवली असली तरी यातून खर्चही नीट भागत नाही.”
- वेदांत शिंदे, हॉटेल व्यवसायिक.