कळस: इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्वर अॅग्रो'' या प्रकल्पाचा अवसायक काढुन लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने सर्वोच्य न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळपर्यंत कोणतीच सुनावणी न झाल्याने कारखान्याचा मंगळवारी (दि २०) रोजी लिलाव होवून कारखाना मोडकळीत निघणार ?असल्याचे निश्चित झाले आहे.
कर्ज असलेल्या बँकेच्या नियमानुसार न्यायालयीन प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव होणार आहे.यामध्ये मोठी मालमत्ता असुनही कारखाना कवडीमोल किमतीत भंगारात विकला जाण्याची शक्यता आहे. कारखाना व्यावस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखाना व्यावस्थापन कर्ज भरण्यास तयार असुन लिलाव रद्ध करावा अशी मागणी करण्यात आली होती.मात्र, सोमवार दि १९ पर्यंत कोणतीही सुनावणी न पार पडल्याने लिलाव निश्चित होणार आहे. शर्कराकंदपासुन इथेनाँल निर्मिती करण्यात यश न आल्याने त्यामधील अडचणी व शासन धोरण ओळखुन साखर कारखाना परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र,अंतराची अट आल्याने परवाना दिला गेला नाही. त्यामुळे उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरवात झाली व गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली, येथील माळरानावर १९९९ साली भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी आपल्या सहकार्याच्या साहायाने सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची उभारणी केली.
भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी झाली होती. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. याठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली. मात्र, कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले त्यामुळे कारखाना डबघाईला आला. तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे. कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे.मात्र लिलाव झाल्यास नुकसान होणार आहे.
इथेनाँल निर्मितीला प्रोत्सहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याने २०२५ पर्यंत ३० टक्के इथेनाँल मिश्रणाला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा लिलाव नुकसानकारक आहे. कारखान्यावर सत्ता असणारी मंडळी पुर्वाश्रमीपासून भाजपात आहेत. केद्रांत सरकार असूनही लक्ष दिले जात नाही.ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.तसेच इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनी आपले शेअर्स जमा केले होते. त्यांचेही नुकसान होणार आहे..............जिल्ह्यातील यशवंत सहकारी व 'हरणेश्वर अॅग्रो' हे कारखाने कर्जाचा बोजा वाढल्याने एकाचवेळी बंद पडले व अवसायक नेमले गेले. दोन्ही कारखान्यांकडे २०० एकर पेक्षा जास्त जमिनी आहेत. यशवंत बचावासाठी जोरदार राजकिय व प्रशासकिय प्रयत्न चालु आहेत. मात्र हरणेश्वरला कोणी कैवारीच राहीला नाही.