पुणे : वृद्धत्व, अपंगत्व, अपघात आणि इतर आजारांमुळे अनेक जण अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना लसीकरण केंद्रांवर घेऊन जाणे शक्य होणे अवघड आहे. अशा परिस्थितीत हाय रिस्कमधील व्यक्तींचे घरी लसीकरण केले जावे, असा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. मुंबई महापालिकेतर्फे १ आॅगस्टपासून ही प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यामध्ये सध्या ‘व्हॅक्सिन आॅन व्हिल्स’ या उपक्रमाअंर्गत दिव्यांग, आश्रमातील वृद्ध, सुपरस्प्रेडर यांचे लसीकरण सुरु आहे. हाय रिस्कमधील व्यक्तींना घरी जाऊन लस देणे ही प्रत्यक्षात वेळखाऊ आणि जोखमीची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे.
पुण्यात सरकारी लसीकरण केंद्रांवर लसींच्या उपलब्धतेबाबत ब-याच अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय लसीकरण केंद्रांवर नियोजनासाठी सध्या संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे. असे असताना घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी वेगळया मनुष्यबळाची गरज भासेल. यामुळे याबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालये घरपोच लसीकरणाची सशुल्क सेवा सुरु करण्याबाबत विचार करत आहेत.
---------------------
लसीकरणाच्या नियोजनाबाबत काम सुरु
दुर्धर आजारपण, अथवा ७५ किंवा ८० हून अधिक वय यांना घरी जाऊन लस देणे गरजेचे आहे, यावर शासनाकडे विविध स्तरांतून मागणी करण्यात आली आहे. घरी जाऊन लस देण्याची प्रक्रिया सुरु झाल्यास लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढेल आणि लसीच्या परिणामकारकतेवरही परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका उच्च न्यायालयाकडे केंद्र सरकारकडून प्रतिज्ञापत्राद्वारे एप्रिल महिन्यात मांडण्यात आली होती. त्यानंतर लसींच्या डोसचे नियोजन कसे करावे, याबाबत नियमावली तयार करण्याचे काम सुरु असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.
-------------------------
अंथरुणाला खिळलेल्या किंवा दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांची हाय रिस्कमधील नागरिकांची वर्गवारी, त्यांची संख्या यांची मोजणी करावी लागेल. लसीकरणासाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता भासू शकते. सध्या संपूर्ण यंत्रणा लसीकरण केंद्रांवर व्यस्त आहे. शिवाय, घरी जाऊन लस दिल्यानंतर अर्धा तास तिथेच थांबावे लागेल. या प्रक्रियेतून दिवसभरात किती जणांना घरपोच लस देता येईल, याचे गणितही आखावे लागणार आहे. शासनाकडून सूचना आल्यास त्याप्रमाणे नियोजन केले जाईल.
- सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
------------------
आतापर्यंत झालेले लसीकरण - ५७,१४,९६४
पहिला डोस - ४३,२६,४३३
दोन्ही डोस - १३,८८,५३१
६०पेक्षा जास्त वयोगट - १४,४८,६१९
पहिला डोस - ९,२१,१६२
दुसरा डोस - ५,२७,४५७