विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यात ३ दशकानंतर इतिहास घडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:15 AM2023-01-19T10:15:07+5:302023-01-19T10:15:14+5:30

उमेदवारीबाबत सगळ्यांमध्येच अनिश्चितता....

Will history be made in the assembly by-elections in the kasaba after 3 decades? | विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यात ३ दशकानंतर इतिहास घडणार का?

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यात ३ दशकानंतर इतिहास घडणार का?

Next

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. सन १९९१मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट यांचा पराभव केला होता. आता या इतिहासाची पुनरावृत्ती घडणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

असा आहे इतिहास

कसबा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. सलग ५ वेळा तिथून भाजपचे गिरीष बापट विजयी झाले. त्यांच्याही आधी अण्णा जोशी, त्याआधी अरविंद लेले या भाजपच्याच उमेदवारांनी तिथून निवडणूक जिंकली होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी लोकसभेची निवडणूक जिंकली व ते खासदार झाले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर प्रथमच पोटनिवडणूक झाली.

काय झाले होते पोटनिवडणुकीत?

काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय. तो पोटनिवडणुकीत मिळाला होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सुरू झाली आहे.

निवडणूक २०१९ ची

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा मुक्ता टिळक यांनी भाजपकडून पराभव केला. शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी ७५ हजार ४९२ मते मिळवली. शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. मुक्ता टिळक यांचा निवडणुकीत सहज विजय झाला होता. त्याच जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.

आयोगाकडून दे धक्का

निवडणूक आयोगाकडून लगेचच या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपच काय, पण अन्य राजकीय पक्षांमध्येही ही जागा लढविण्याबाबत किंवा उमेदवार निश्चित करण्याबाबत काहीच चर्चा नव्हती. मात्र, बुधवारी आयोगाने अचानक कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा रीतसर कार्यक्रमच जाहीर केला. त्यामुळे आता उमेदवारी कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारीबाबत सगळ्यांमध्येच अनिश्चितता

महाविकास आघाडीत अद्याप याबाबत अनिश्चितता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यांच्यात अद्याप याबाबत काहीच चर्चा नाही. खुद्द भाजपमध्येही उमेदवारीबाबत काहीच ठरलेले नाही. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतली. त्यांच्याकडून काहीच कळविण्यात आलेले नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेच आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाने आदेश दिल्यास कसब्यातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सव्वादोन हजारांनी अधिक

कसबा मतदारसंघ (मतदार)

एकूण : २ लाख ७५ हजार ४२८

पुरुष : १ लाख ३६ हजार ८७३

महिला : १ लाख ३८ हजार ५५०

तृतीयपंथी : ५

शहरातील आठ मतदारसंघांमध्ये मतदारांच्या संख्येत कसब्याचा क्रमांक सहावा आहे. या मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या सव्वादोन हजारांनी अधिक आहे.

काय आहेत शक्यता? 

-- निवडणूक बिनविरोध- मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास सहानुभूती म्हणून महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्ष उमेदवारच देणार नाहीत.

-- अन्यायाची भरपाई- मागील विधानसभा निवडणुकीत मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकात पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. सिटिंग आमदार असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली. त्या अन्यायाची भरपाई म्हणून यावेळी इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.

- इच्छुकांना संधी- कोथरूड मतदारसंघातून भाजपमध्येच बरेच इच्छुक आहेत. खासदार व या मतदारसंघाचे माजी आमदार, पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

-- विरोधकांचे इच्छुक - यात मागील वेळचे काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांचा समावेश आहे.

अशी असेल पोटनिवडणूक २०२३

- टिळक कुटुंबातील उमेदवार असल्यास भारतीय जनता पक्षाला सहानुभूतीची लाट.

- दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे कसब्यात विकासकामे झालीच नाहीत हा मुद्दा येईल.

- प्रलंबित विकासकामांचा दावा विरोधी उमेदवारांकडून होऊ शकतो.

- भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्याचे भावनिक आवाहन भाजपकडून

- भाजपचे वर्चस्व मोडून काढण्याची संधी याचा विरोधकांकडून वापर

Web Title: Will history be made in the assembly by-elections in the kasaba after 3 decades?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.