नम्रता फडणीस
पुणे : नोकरी कधी मिळेल, भाड्याच्या जागेतला व्यवसाय बंद केलाय तो पुन्हा कधी सुरू करता येईल, लग्न कधी होईल या प्रश्नांचा शोध अनेकांना घ्यायचा आहे. कोरोनाचा काळ कधी संपणार याच्या चिंतेत काहीजण आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरातील सर्व सदस्य कधी नव्हे इतका काळ एकत्र घालवू लागल्याने मानसिक घुसमट, नात्यांमधला कडवटपणा, संशयकल्लोळ या समस्या कधी नव्हे एवढ्या वाढल्या आहेत. या सगळ्यांची उत्तरे ज्योतिषाकडून जाणून घेणाऱ्यांची संख्या कोरोनाच्या संकटानंतर वाढली आहे.
आपल्या पत्रिकेतच दोष नाही ना, जन्मकुंडलीतले योग काय सांगतात या प्रश्नांच्या गर्तेत अनेक कुटुंबे अडकली आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषांकडून सल्ले घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात सुशिक्षित महिला आणि तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक ज्योतिषांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले आहे. राजकीय आकांक्षा असणाऱ्यांना गंडेदोऱ्यांचा आधार शोधावासा वाटतो आहे. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमधली भ्रष्टाचारी धेंडेदेखील ज्योतिषाच्या आड सुरक्षितता शोधत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या संकटाने समाजजीवन ढवळून निघाले आहे. टाळेबंदी, पगारकपात, धंदा-व्यवसायातील चढउतार यामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. उत्पन्नाचे मार्ग आक्रसल्याने विशेषत: मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. राजकारणात यश मिळेल का याची काळजी अनेकांना आहे. सरकारी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराने कमावलेली संपत्ती उघड होणार नाही ना याची धास्ती असते. त्यासाठी ही मंडळी ‘हपापाचा माल’ ज्योतिषांच्या पायाशी ओततात. भविष्यात काय लिहिले आहे, कोणता ग्रह वक्री आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचे दार ठोठावले जात असल्याचे सांगण्यात आले. ज्योतिषतज्ञांकडून रीतसर वेळ मार्गदर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
चौकट
पत्रिका बघणाऱ्यांची वाढली संख्या
“गेल्या दीड वर्षांपासून बहुतांश नोकरदारांचे ’वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. नवरा चोवीस तास घरात असल्याने महिलांची मानसिक घुसमट होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला विचारला जातो. याशिवाय ३० ते ४२ वर्षीय तरुणांना नोकरी जाणे, पगारकपातीची समस्या आहे. सध्या ग्रहमान वाईट आहे का, स्थिती कधी सुधारेल अशी विचारणा त्यांच्याकडून केली जाते. उच्च मध्यमवर्गीयांमध्ये ‘पती व्यसनाच्या आहारी गेलाय’ यासारखे वेगळेच प्रश्न आहेत. कोरोना आल्यापासून पत्रिका बघणाऱ्यांची संख्या वाढली आहे.” - गौरी केंजळे, ज्योतिषतज्ज्ञ
चौकट
मुलाची गेली नोकरी
“कोरोनाकाळात गेल्या वर्षी माझ्या मुलाची नोकरी गेली. अजूनही नोकरी लागलेली नाही. नोकरी नसल्याने लग्न जमवणे अवघड झाले आहे. त्याचीच खूप चिंता वाटल्याने ओळखीच्यांकडून ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेतला. मनातल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली की ताण कमी होतो.”
- सुधा रिसबूड, मध्यमवर्गीय गृहिणी
चौकट
‘शॉर्टकट’चे खूळ सुशिक्षितांमध्येच
“कोरोनाकाळात समाजात अनिश्चितता वाढत आहे. नोकऱ्या गेल्या, वाढती महागाई, घरातील व्यक्ती आज आहे उद्या नाही अशा सगळ्यांमुळे लोकांच्या मनावर ताणतणाव अधिक आहे. मोह आणि भीती असली तरी लोकांची कष्ट करण्याची तयारी नसते. त्यांना ‘शॉर्टकट’ हवा असतो. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम हवा, असे सांगितले तर ते नकोय पण ‘असाध्य आजारांवर आमच्याकडे रामबाण उपाय आहे,’ असे म्हटल्यावर लोक विश्वास ठेवतात. ‘एखादा भोंदूबाबा पैशाचा पाऊस पाडतो,’ असे सांगितल्यावर त्याला लाखो रूपये देतात आणि आहे तो पैसा गमावतात. ज्यांच्याकडे पैसा आणि वेळ आहे अशी सुशिक्षित मंडळीच भोंदूबाबा किंवा ज्योतिषतज्ज्ञांचा आधार घेत आहेत.”
- मिलिंद देशमुख, सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती