पुणे : रिंग रोडच्या प्रस्तावानंतर गेल्या दहा वर्षांत पुणे शहरालगतच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे रिंग रोडची हद्द वाढविण्यात येणार असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नवीन रिंग रोडमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चाकण विमातनतळाचा विचार करून हद्दवाढ करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने या रिंग रोडची आखणी करण्यात आली आहे. सन २००७ मध्ये रस्त्यांची आखणी करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षे यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला व सन २००९ मध्ये शहराभोवतालच्या सुमारे १७० किलो मीटरचा रिंग रोड करण्याचे निश्चित करण्यात आले.या रस्त्यासाठी त्या वेळच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या रिंग रोडसाठी सुमारे सहा हजार एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. सर्वाधिक खर्च भूसंपादनासाठीच द्यावा लागणार आहे. हा रिंग रोड सहापदरी असणार असून, यामध्ये चारचाकी वाहने, पादचारी, सायकल ट्रक यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता या रिंग रोडमध्येच मेट्रो रेल्वे आणि बीआरटीसाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. अमेरिकेची एईकॉम एशिया लिमिटेड ही कंपनी सर्वेक्षणाचे काम करीत असून, प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये गेल्या दहा वर्षांत रिंग रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रिंग रोडची हद्द वाढविण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने रिंग रोडच्या हद्द निश्चित होणार आहे.
पुण्याच्या रिंग रोडची हद्द वाढविणार
By admin | Published: February 27, 2015 5:58 AM