कळस : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पळसदेव गट व महिला राखीव तसेच ओबीसी गटात जागाप्रमाणेच अर्ज प्राप्त झाल्याने ६ जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे यामध्ये इंदापूर, कालठण, पळसदेव, भिगवण, शेळगाव या पाच गटामधून प्रत्येकी ३ संचालक, भटक्या जमाती प्रवर्ग १, मागास प्रवर्ग १, अनुसुचित जमाती १, महिला राखीव २ आणि ब वर्ग १ असे एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यामध्ये शेळगाव गट ५, भिगवण गट १०, कालठण गट ९, पळसदेव गट ३, इंदापुर गट ९, अनुसूचित जाती जमाती गट २, विमुक्त जाती २, ओबीसी १, महिला २, ब वर्ग ३ असे एकूण २१ जागेसाठी ४६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पळसदेव गट ३ व महिला राखीव २, तसेच ओबीसी गटामधुन १ अशा सहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत.
माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज कालठण गट व ब वर्गामधून २ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच पाटील यांचे समर्थक वसंत मोहोळकर यांनीही ब वर्ग मधून अर्ज दाखल केला आहे. सोमवारी २७ तारखेला उमेदवारी अर्जांची छाननी असून माघार घेण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर असणार आहे. त्यामुळे अंतिम चित्र त्याचदिवशी स्पष्ट होणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे पी गावडे यांनी कामकाज पाहिले.