पुणे : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याची उत्सुकता काही तासातच संपणार आहे. रविवारी ( दि.24)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षांची निवड होणार? असून, संमेलनाची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार
आहे. संंमेलनासाठीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून, येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान संंमेलन कुसुमाग्रजांच्या भूमीत नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तारखांची अधिकृत घोषणा बैठकीनंतरच केली जाणार आहे.
साहित्य संंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, लातूरमधील ज्येष्ठ लेखक प्रा. जनार्दन वाघमारे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्यासह काही नावे महामंडळाकडे पाठविण्यात आली आहेत. रविवारी (24) होणा-या बैठकीत चारही घटक संस्थांतर्फे प्रत्येकी 3 प्रतिनिधी, पाच संलग्न संस्था आणि एका समाविष्ट संस्थेचे प्रत्येकी 1 याप्रमाणे सहा प्रतिनिधी व विद्यमान संंमेलनाध्यक्ष अशा 19 मतांचा कौल घेत संंमेलनाध्यक्ष बहुमताने निवडला जाणार आहे. मात्र संमेलनाध्यक्षाच्या शर्यतीत डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव मोठे असल्याने त्यांना डावलणे योग्य ठरणार नाही, असा एक सूर ऐकायला मिळत आहे.
कोरोना अजूनही संपलेला नाही, डॉ. नारळीकर यांचे वय बघता त्यांना संमेलनाध्यक्ष करणे उचित ठरेल का? तीन दिवस ते संंमेलनाला उपस्थित राहू शकतील का? त्यांनी काही अटीही ठेवल्या असल्याचे समजते. एकंदरच त्यांच्या आरोग्याचा देखील महामंडळाला विचार करायला हवा अशी एक चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.
--------------
आता मराठवाड्याला झुकते माप ?
डॉ. रामचंद्र देखणे संंमेलनाध्यक्ष व्हावेत अशी मागणी पुण्यातून काही संस्थाकडून केली जात आहे. यापूर्वी डॉ. सदानंद मोरे, डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ. अरूणा ढेरे आणि लक्ष्मीकांत देशमुख असे पुण्याचे संमेलनाध्यक्ष झाले आहेत. प्रा. जनार्दन वाघमारे आणि भारत सासणे यांच्या नावाकडे मराठवाडयाचा कल अधिक आहे. त्यामुळे बैठकीत कुणाच्या गळ्यात संमेलनाध्यक्षाची माळ पडणार? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
---------------------------------------------
रविवारी (दि.24) सकाळी 11 वाजता साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. संमेलनाध्यक्ष, संपूर्ण कार्यक्रमपत्रिका आणि प्रतिनिधी शुल्क यावर चर्चा होऊन त्यांची घोषणा केली जाईल तसेच तारखाही जाहीर केल्या जातील.
- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ
----------------------------------------------