पुणे : आधीच दुरंगी असणारी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी झाली. आता ही निवडणूक चौरंगी व्हावी, यासाठी राजकीय मोर्चेबांधणी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेच्या राजकारणातील एका माजी पदाधिकाऱ्याला एमआयएम (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन)ची उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले जाणार असल्याचे समजते. याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही, मात्र यादृष्टीने जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. एका विशिष्ट गटाची मते एकगठ्ठा एकाकडेच जावीत आणि त्याचा फटका त्या मतांचा आधार असलेल्या दुसऱ्या उमेदवाराला बसावा, अशा पद्धतीने ही खेळी करण्यात येत आहे. तशी मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती मिळाली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि ‘वंचित’चे वसंत मोरे हे तीनही उमेदवार महापालिकेच्या राजकारणातील दिग्गज आहेत. सलग तीन-तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आपापल्या प्रभागातील राजकारण सांभाळण्यासह संपूर्ण शहराचे कामही महापालिकेतील पदाधिकारी म्हणून त्यांनी पाहिले आहे. त्यामुळेच शहराचे सगळे राजकारण त्यांना जवळून माहीत आहे. त्याच आधारावर आता ते राजकारणातील मोठी उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. एका पक्षाकडून ‘एमआयएम’चा उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात यावा यासाठी प्रयत्न केले असल्याचे समजते.
विसर्जित महापालिकेत ‘एमआयएम’च्या अश्विनी डॅनियल लांडगे या नगरसेवक होत्या. त्यामुळे शहरात बऱ्यापैकी पक्षसंघटन आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. किमान काही हजार मते स्वतंत्रपणे मिळवली गेली तरी त्याचा तोटा दुसऱ्या उमेदवारास हाेताे. तर आणखी कोणास त्याचा फायदा होऊ शकतो अशा विचारानेच ही युक्ती केली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.