आमदार अतुल बेनकेंना पुन्हा पक्षात घेणार?; शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने अमोल कोल्हे खळखळून हसले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:18 PM2024-07-20T12:18:21+5:302024-07-20T12:21:31+5:30
शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिरकस भाष्य करत सस्पेन्स कायम ठेवणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.
Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर अतुल बेनके यांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिरकस भाष्य करत सस्पेन्स कायम ठेवणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.
अतुल बेनके यांच्या भेटीविषयी विचारले असता शरद पवार म्हणाले की, "अतुल बेनके यांनी माझी भेट घेतली, यात नवीन काय आहे? त्यांचे वडील माझे मित्र होते. राजकारण होत असेल तर विधानसभा निवडणुकीवेळी त्याचा निकाल घेऊ. पण आता त्याबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मात्र एक साधी गोष्ट आहे की, ज्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे आहेत. ज्यांनी आमचं काम केलं त्यांच्या हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी आहे," असं शरद पवारांनी म्हटलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांच्यासह इतर उपस्थितही खळखळून हसले. अतुल बेनके यांनी लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावरील उमेदवाराचं काम केल्याकडे पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंगुलीनिर्देश केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
दरम्यान, अतुल बेनके हे आगामी काळात तुमच्या पक्षात येणार का, असं विचारलं असता शरद पवारांनी म्हटलं की, "ते हल्ली कोणत्या पक्षात आहेत, हे मला माहीत नाही. आमच्यात कसलीही राजकीय चर्चा झाली नाही."
लोकसभेदरम्यान जुन्नरमध्ये काय घडलं?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले. जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
अजित पवारांसाठी धोक्याची घंटा
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची धाकधूक वाढली असून यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता भेटीगाठींचा जोर वाढल्याने आगामी काळात ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे.