मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:49 PM2023-07-04T20:49:40+5:302023-07-04T20:57:39+5:30
बाळा भेगडे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी तर सुनील शेळके हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी
वडगाव मावळ : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे मावळ तालुक्यात माजी मंत्री बाळा भेगडे व विद्यमान आमदार सुनील शेळके हे मामा-भाचे पुन्हा एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आमदार सुनील शेळके यांनी ९०० कोटींचा निधी आणला. वडगाव येथील शासकीय इमारत, पोलिस ठाणे इमारत, कान्हे येथील रुग्णालयाच्या इमारतीसह तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागली. महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना ‘ब्रेक’ लागला.
यानंतर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी ५० ते ६० कोटी रुपयांचा विकास निधी आणला. या विकासकामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. त्यासोबतच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते.
आजी-माजी दोघेही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे
माजी मंत्री बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात, तर दुसरे आमदार सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हे दोघे तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आल्यास तालुक्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. यासाठी दोघांनीही मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत
शरद पवार आमचे दैवत आहे तर अजित पवार आमचे नेते आहेत. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी मी देखील हजर होतो. विविध विकासकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांना तोड नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे मी वेगळे मानत नाही. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झालेला दिसेल. - सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा