लक्ष्मण मोरे
पुणे : पुणेकरांनी २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरात भरघोस मते टाकली होती. तब्बल २९ नगरसेवकांसह मनसेने शहरात जोरदार मुसंडी मारली होती. परंतु, लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला अल्पावधीत तडा गेला. मागील पालिका निवडणुकीमध्ये अवघ्या दोन नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. गेल्या पाच वर्षांत पाच शहराध्यक्ष नेमण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात झाली असली तरी पाच वर्षांत आलेली मरगळ झटकणे, निष्क्रिय असलेल्यांना सक्रिय करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गटबाजी थोपविण्याचे आव्हान शहर मनसेसमोर आहे.
शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यभर दौरा केला होता. पुण्यात बाजीराव रस्त्यावरील नूमविसमोर त्यांनी घेतलेल्या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मराठीच्या मुद्द्यावर केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबईच नव्हे तर पुण्यानेही त्यांना साथ दिली होती. २०१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेने अपेक्षेपेक्षा अधिक यश संपादन केले होते. तब्बल २९ नगरसेवक निवडणूक जिंकले. तर, बहुतांश पराभूत उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, मोदी लाटेत आणि पक्षातील अंतर्गत लाथाळ्या यामुळे २०१७ साली प्रचंड मोठा फटका पक्षाला बसला.
आलेल्या अपयशाला कोण कारणीभूत याचा शोध घेण्याचाही पक्षीय पातळीवर प्रयत्न झाला. त्यातही राज ठाकरे यांनी टोलसह विविध प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेमुळे पक्ष तग धरून राहिला. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तसेच वेळोवेळी पक्षाच्या भूमिकांमुळे होत गेलेल्या बदलांमुळे कार्यकर्ते संभ्रमित झाले. गेल्या चार-पाच वर्षांत शहरात संघटनात्मक फळी जेवढी मजबूत व्हायला हवी होती तेवढी ती झाली नाही. नव्या शाखा, सदस्य नोंदणी यावर परिणाम झाला. मनसेचा मूलतः असलेला आक्रमकपणा गेल्या काही काळात कमी झाला. मनसे मवाळ झाल्याची टीका होऊ लागली होती. एवढेच नव्हे तर विविध आंदोलने, नागरी प्रश्न, विधानसभा आणि पदवीधर निवडणुकीमध्ये गटबाजी प्रकर्षाने समोर येत राहिली.
गेल्या चार-पाच वर्षांत विक्रम बोके, ढोरे, संभूस, बाळा शेडगे, अजय शिंदे हे शहराध्यक्ष झाले. आता नव्याने शहराध्यक्षपदाची जबाबदारी पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी नवीन कार्यकारिणी गठीत केली आहे. मात्र, शेवटच्या घटकांपर्यंत पुन्हा पोचणे, मनसेच्या हक्काच्या आणि काठावरील मतदारांना पुन्हा आपल्याकडे खेचणे, नागरी प्रश्न धसास लावणे, सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडणे हे निकराने करावे लागणार आहे. पालिका निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. या काळात शहर मनसेला पुन्हा नव्या जोमाने उभारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व कशी ‘ताकद’ देते हे पाहावे लागणार आहे. २०१२ प्रमाणे जर पुन्हा ‘कमबॅक’ करायचे असेल तर रात्रीचा दिवस करण्याशिवाय मनसेसमोर पर्याय नाही.
-------
मनसेला २०१२ साली यश मिळाले होते. त्यावेळी दोन सदस्यीय प्रभाग पद्धती होती. आताही तशीच होण्याची शक्यता आहे. मनसेच्या मतदाराला पुन्हा खेचण्यात आम्ही यशस्वी होऊ. जुन्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय करीत आहोत. लोकांना माहिती असलेले जुने चेहरे फायद्याचे ठरतील. पुणेकरांना अभिप्रेत असलेली ‘मनसे’ पुन्हा नक्की दिसेल.
- वसंत मोरे, शहराध्यक्ष तथा गटनेते, पुणे महापालिका