पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला आठ ते नऊ दिवस उलटून गेल्यावर कोणतीच कारवाई करण्यात आले नाही. तसेच वानवडी पोलीस ठाण्यात अद्याप एफआयआर सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही. आता याप्रकरणी पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीने वानवडी पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुण्यामध्ये २२ वर्षांच्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी( दि.7) इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. याप्रकरणी ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने या प्रकरणाला गंभीर वळण घेतले आहे. मात्र, आठवडा उलटून सुद्धा पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे.
आता पुण्यातील वकिलांच्या संघटनेने पूजाच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारी वानवडी पोलीस ठाणे गाठले. त्याचवेळी पूजाच्या घटनेत पोलिसांनी अद्यापही एफआयआर का दाखल केला नाही हे संशयास्पद असल्याचे म्हणत तक्रार दाखल केली.तसेच घटनेला इतके दिवस उलटून देखील पोलिसांनी साधा एफआयआर सुद्धा का दाखल करून घेतला नाही. हा दखलपात्र गुन्हा असून सुद्धा पोलिसांच्या दिरंगाईमुळे घटनेशी संबंधित संशयित आरोपी म्हणून ज्यांचे नावे समोर येत आहे त्यापैकी काही जण फरार होत आहे. पोलीस प्रशासन याबाबत कुठली कारवाई करतेय की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. दखलपात्र गुन्हा असून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला जात नसेल तर ही चुकीची बाब आहे. आणि त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
अॅड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, सुशांतसिंग राजपूत केसमध्ये बिहारमध्ये एफआयआर दाखल झाला आणि नंतर तपास केला गेला. तपासानंतर सत्य असत्य बाहेर येईल. मात्र, सर्वात आधी पोलिसांनी एफआयआर तरी दाखल करायला हवा. पूजेची हत्या झाली की आत्महत्या हे अजून कळालेले नाही. जर एफआयआरच दाखल केला नाहीतर पोलीस तपास कसा करणार? पुणे पोलिसांनी चौकशीची पावले उचलली नाहीत तर हायकोर्टात जाण्याचा इशारा पुण्यातील जस्टीस लीग सोसायटीने दिला आहे.