बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:13 AM2024-07-15T10:13:50+5:302024-07-15T10:16:04+5:30

अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता.

Will not contest assembly elections from Baramati Ajit Pawar first reaction | बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

Ajit Pawar Baramati ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अजित पवार हे यंदा आपले पुत्र जय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवतील, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र स्वत: अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावत मी बारामती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभेत मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही साथ दिली नाही तर मी विधानसभा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलं होतं. हे वक्तव्य आता त्यांच्या राजकीय विरोधकांकडून व्हायरल केलं जात आहे. तसंच दुसरीकडे, अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. परंतु अजित पवार यांनी खुलासा करत आपण बारामतीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबतचं वृत्त 'साम टीव्ही'ने दिलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बारामतीत राष्ट्रवादीकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते.

बारामती विधानसभेत अजित पवारांना कोण देणार आव्हान?

लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना संधी देऊ शकतात. 

Web Title: Will not contest assembly elections from Baramati Ajit Pawar first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.