पुणे: महापालिकेत समाविष्ट झालेल्या येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात बरेच काही चुकीचे झाले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात चुकीचे काहीही होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रशासनाने अगदी सुरूवातीला तयार केलेल्या आराखड्यालाच मंजूरी देण्याची मागणी करणार आहोत असे भारतीय जनता पाटीर्चे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.आमदार योगेश टिळेकर यांनी या आराखड्यातील बदलांसाठी भेट म्हणून मर्सिडीज गाडी घेतल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्याआधी पालकमंत्री गिरीश बापट तसेच भाजपाच्या अन्य काही आमदारांच्या दबावातून नियोजन समितीत असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी आराखड्यात बराच बदल केला असल्याची चर्चा होती . त्यात आता भाजपाचेच खासदार काकडे यांनी भर घालत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काकडे यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे यांनी सांगितले.काकडे म्हणाले, माझ्याकडे त्या परिसरातील काही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. अन्य ठिकाणचे आरक्षण बदलून त्यांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले असे त्यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय समितीने तयार केलेला आराखडाच मंजूर व्हायला हवा. त्यांच्यापेक्षा कोणीही राजकारणी हुशार असूच शकत नाही. सध्या आहे तसा नियोजन समिती व शहर सुधारणा समितीने बदल केलेला आराखडा मंजूर झाला तर तो पुणेकरांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा चांगला आहे व तोच मंजूर झाला तर पक्षासाठी चांगले असेल. अन्यथा कोणा एकाच्या आग्रहासाठी पक्षाची प्रतिमा खराब होईल व तसे कधीही होऊ देणार नाही................महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पत्र देऊन प्रशासनाचा, शहर सुधारणा समितीचा व नियोजन समितीचा असे तिन्ही आराखडे मागवले आहेत व त्यांच्यातील बदलांचीही माहिती मागवली आहे. नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर यांच्याकडे या तिन्ही आराखडट्यांची चर्चा करू, त्यासाठी आराखडा तयार करणाऱ्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांनाही बोलावले जाईल. या सगळ्याचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देऊन त्यांच्याकडे प्रशासनाच्या आराखडट्याचा आग्रह धरण्यात येईल. संजय काकडे, सहयोगी खासदार, भाजपा.
येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात चुकीचे काही होऊ देणार नाही : संजय काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 8:39 PM
पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे..
ठळक मुद्देप्रशासकीय समितीने तयार केलेला आराखडाच मंजूर व्हायला हवानियोजन समितीत असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी आराखड्यात बराच बदल केला असल्याची चर्चा