- नारायण बडगुजर
पिंपरी : गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी उपद्रवींवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. भांडण करणाऱ्या आरोपींकडून यापुढे भांडणार नाही, जुगाऱ्यांकडून जुगार खेळणार नाही, असे बंधपत्र घेतले जात आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी तब्बल दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे उपद्रवी तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपी व सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. यंदा मात्र निर्बंधमुक्त उत्सव आहे. त्यामुळे कोठे गडबड, गोंधळ होऊ नये, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्सवकाळात उपद्रव घालणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. वादविवाद करणाऱ्यांपासून ते अवैध धेंदे चालविणाऱ्यांपर्यंत, तसेच चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच असणार आहे. या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
बाप्पांच्या सुरक्षेची विशेष काळजीयंदा श्रींच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी अधिक काळजी घेतली आहे. स्वयंसेवकांना २४ तास सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना आहेत. बाहेरून मोठी कुमक मागवली आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत होण्यासाठी पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
‘मोक्का’ अंतर्गत पाच कारवाया
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून ‘कोम्बिंग’ ऑपरेशन सुरू आहे. यात सराईताना ताब्यात घेत चौकशी केली जाते. तसेच वाॅरंट बजावण्यात येत आहेत. काही उपद्रवींवरही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही.
चाकण, चिखलीत सर्वाधिक कारवाया-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणे असून त्यातील चाकण ठाण्यांतर्गत सर्वाधिक १८५ तर चिखली ठाण्यांतर्गत १५७ प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या. तसेच देहूरोड (१४५), भोसरी एमआयडीसी (१२६), भोसरी (१२३), हिंजवडी (१२२), आळंदी (११९), वाकड (११७), तळेगाव दाभाडे (११७), म्हाळुंगे (११०), पिंपरी (१०१) या पोलीस ठाण्यांतर्गतही कारवाया झाल्या.
प्रतिबंधात्मक कारवाया
प्रकार - कारवाई१०७ - २०९११० - १२५१४४ (२) - १६७१४९ - १३५४१५१(१)/(३) - १३मपोकाक ५५, ५६, ५७ - ३५प्रोव्ही. ९३ - ४०१४२ - २एमपीडीए - ४मोक्का - ५
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. बंदोबस्तासाठी जादा कुमक मागविली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड