पाईट : भामा आसखेड धरणामधून पुणे शहराला पाणी देण्याचा प्रश्न आज पुन्हा एकदा पेटला. मागण्या मान्य होईपर्यंत पाइपलाइनचे काम थांबवा, अशी मागणी करूनही काम सुरूच राहिल्याने आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. करंजविहिरे गावच्या हद्दीत हे आंदोलन झाले असून, संतप्त आंदोलकांनी मशिनरीचीही तोडफोड केली. ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.या वेळी आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला जिल्हासंघटक विजयाताई शिंदे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्ह परिषद सदस्य किरण मांजरे यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना होत असलेल्या जलवाहिनेचे काम जोरदार सुरू आहे. आमदार सुरेश गोरे यांनी पुनर्वसन होत नाही, आळंदी शहरास पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, पुरवठा व लाभक्षेत्रातील गावांच्या जमिनीवरील शिक्के काढत नाही, तोपर्यंत जलवाहिनीचे काम थांबविण्याची मागणी केली होती; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज शिवसैनिक आक्रमक झाले.करंजविहिरे गावच्या हद्दीमध्ये आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यानंतर मशिनरीच्या काचा फोडत घोषणा दिल्या. यापुढे एक इंचही काम झाल्यास आंदोलन उग्र स्वरूपात केले जाईल, असा इशारा दिला. (वार्ताहर)
पुण्याला पाणी देणार नाही!
By admin | Published: October 16, 2015 1:17 AM