येरवडा : धानोरी येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना जमावाने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना अतिशय निंदनीय असून, आगामी काळात महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सुरक्षेबाबत जास्तीत जास्त उपाययोजना केल्या जातील. अतिक्रमण विभाग हल्ले खपून घेणार नाही. निर्मूलनाची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
मंगळवारी दुपारी महापालिकेचा आकाशचिन्ह बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने परिमंडळ चार विभागात संयुक्त कारवाई मोहीम सुरू होती. या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक व काही व्यावसायिकांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दगडफेक करून मारहाण केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे 25 ते 30 जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आगामी काळात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करणार आहे. तसेच कारवाईदरम्यान प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी यांना देखील चोख बंदोबस्त देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून अतिक्रमण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधनांचा देखील आगामी काळात वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान बुधवारी येरवडा विभागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना कारवाईदरम्यान अशाप्रकारे हल्ले करणे ही बाब अत्यंत निंदनीय असून मुळातच नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यवसाय तसेच नागरिकांवर आगामी काळात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.