पुणे : मराठी साहित्य, संस्कृतीचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न राहणार असून, साहित्य परिषद, महामंडळाशी संवादाची भूमिका असणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही. संमेलनाच्या व्यासपीठावरील अध्यक्षांची खुर्ची बळकाविण्याचा प्रयत्न झाला तर लेचापेचा राहणार नाही, असा सज्जड इशारा ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य परिषद आणि महामंडळाला दिला.पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. सबनीस निवडून आल्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांचा परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते रविवारी सत्कार करण्यात आला. परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ८८व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. भालचंद्र शिंदे व्यासपीठावर होते.ते म्हणाले, की साहित्य संस्थांची एक परंपरा असते. कुठे चुकल्यास वाद-संघर्ष होतात. या जागा संवादाने घेतल्यास संघर्षाची वेळ येत नाही. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘साहित्यिकांची भूमिका राजकारण्यांपलीकडची असते. साहित्यिक प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे बघू शकतात. डॉ. शेजवलकर यांनी प्राचार्य सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा गौरव केला. सुरुवातीस महामंडळाचे उपाअध्यक्ष शिंदे यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन दीपक करंदीकर यांनी केले. आभार सुनील महाजन यांनी मानले. (प्रतिनिधी)
अवमान खपवून घेणार नाही
By admin | Published: November 09, 2015 1:52 AM