पुणे : ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल पाहून दाेषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीतानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना रविवारी दिली.
या रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १३ रूग्ण आयसीयु वाॅर्ड मधील तर चार रुग्ण जनरल वाॅर्ड मधील आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अदयाप गुलदस्त्यात आहे. याबाबत आराेग्यमंत्री सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमके काय घडलं हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त झाला की, त्यातील दोषींवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल.
सावंत पुढे म्हणाले की, ठाण्यातील हे हाॅस्पिटल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. परंतु, वैदयकीय शिक्षण देखील आमच्याच अंतर्गत येते. हाॅस्पिटल हे काेणाच्याही अंतर्गत येत असले तरी मृत्यू हा मृत्यूच असतो. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
या ठिकाणी काय घडलं त्याची माहिती आम्ही घेत आहोत. रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणे व सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड हाेणं हे मुळीच सहन करणार नाही, अशी सक्त ताकिद देत ही घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली यामध्ये कुणीही पडू नये. सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच असे तानाजी सावंत यांनी जाहीर केले.