पुणे : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली तर यापुढे सहन केले जाणार नसून अशा नागरिकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. दर आठवड्याला आम्ही बैठक घेऊन शहराचे प्रश्न सोडवत आहोत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शहराचा वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. लोकांच्या सुरक्षिततेची भावना वाढेल असे काम करायचे आहे. मात्र, पोलिसांशी वाद घालून पोलीस यंत्रणेची बदनामी केली जात असेल तर मात्र दोषींवर कारवाई केली जाईल. याबाबतचे खटले जलद न्यायालयात चालवायची विनंती केली जाईल, असेही ते म्हणाले.
वेंकटेशम पुढे म्हणाले की, सायबर पोलीस स्टेशन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचारासबंधी महिला सेल, बडीकॉप पथक आहे. तसेच आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गणपती आणि उत्सव कायद्याच्या अधीन राहून साजरे करावेत. त्यासाठी मंडळांची भेट घेणे सुरू आहे.
शहराचे नाव बदनाम करू देणार नाही. आयटी हब असलेल्या पुण्यात सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान आहे. यासाठी पोलिसांची क्षमता वाढवणार आहोत. वेळ आल्यास खासगी संस्थांचीही मदत घेणार असल्याचे वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.