शिरूर : केंद्रीय अर्थसंकल्पात रुग्णांना दिलासा देण्यासाठी जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये डायलेसिसची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय किडनीच्या रुग्णांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. मात्र, ज्या तालुक्यात डायलेसिसची सुविधा (खासगी रुग्णालयात) उपलब्ध आहे. तेथून पुण्यात जाऊन जिल्हा आरोग्य केंद्रात डायलेसिस करणे हे रुग्णांना परवडणारे नाही. पुणे शहराजवळील रुग्णांना याचा हमखास फयदा मिळणार आहे. शिरूर व तालुक्याचा विचार करता रुग्णांना पुण्यात जिल्हा आरोग्य केंद्रात जरी अगदी सवलतीच्या दरात डायलेसिस उपलब्ध झाले, तरी ते परडणारे नाही. कारण शिरूर शहरात धारिवाल रुग्णालयात डायलेसिसची सुविधा आहे. येथे प्रतिडायलेसिस ५०० रुपये आकारले जातात. अगदी गरीब रुग्णांना मोफतही डायलेसिस केले जाते. पुण्याला जाण्या-येण्यास एसटीला २०० रुपये खर्च आहे. रुग्णाच्या सोबत एक व्यक्ती आवश्यक असते. त्या दोघांचा एसटीप्रवास खर्च ४०० रुपये, तेथून बस खर्च, भोजनाचा खर्च पाहता शिरूरच्या रुग्णांना येथेच डायलेसिस करणे सोयीस्कर दिसते. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव-भीमा, तसेच पश्चिम भागातील रुग्णांना जिल्हा आरोग्य केंद्र तसे जवळ आहे. तेथील रुग्णांना या सुविधेचा फायदा घेता येईल. येथील ग्रामीण रुग्णालयात दर महिन्याला सरासरी दोन ते तीन किडनीचे रुग्ण येतात. त्यांना डायलेसिसची आवश्यकता असते, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास बत्ते यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य केंद्रात डायलेसिस सवलतीच्या दरात अथवा मोफत उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा होईल, असे किडनी आजाराचे रुग्ण नीलेश गुजर यांनी सांगितले. गुजर सध्या शिक्रापूरला राहात असून, त्यांना महिन्यातून आठ वेळा डायलेसिस करावे लागते. पुण्यापासून कमी अंतरावर असणाऱ्या रुग्णांना जिल्हा केंद्रात उपलब्ध होणाऱ्या डायलेसिस सुविधेचा फायदा मिळू शकणार आहे.
जिल्हा केंद्रात डायलेसिससाठी जाणे रुग्णांना परवडेल?
By admin | Published: March 01, 2016 1:12 AM