राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासंदर्भात पुणे येथील विमानतळावर सर्व बैलगाडा संघटनांच्या प्रमुखांना घेऊन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. या वेळी भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख, प्रसिद्ध बैलगाडामालक अण्णासाहेब भेगडे, रामकृष्ण टाकळकर, भगवान शेळके, भाजपाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, विश्वास शेटे, आबा शेवाळे, सुहास भालेकर, देविदास कदम, बाजीराव शिंदे, रोहन महाराज, पप्पू कामठे, बाळासाहेब भोर, भानुदास वर्पे यांच्यासह बैलगाडा मालक उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या राजवटीतच बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला होता. परंतु दुर्दैवाने त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा या शर्यती बंद झाल्या. मात्र, त्यानंतर राज्यात आलेल्या सरकार बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत. बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेईन. तसेच बैलांच्या पळण्याच्या क्षमतेचा मुद्दाही न्यायालयाला पटवून देऊ. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीबाबत प्रलंबित असलेली सुनावणी तत्काळ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील.